‘योगी सर्वकाळ सुखदाता’ या अभंगात संत श्री एकनाथ यांनी योगी पुरुषाची महानता अत्यंत समर्पक शब्दांत दाखवली आहे. त्यांनी योगी पुरुषाची तुलना ‘जीवन’ अर्थात पाण्याशी केली आहे. पाण्यापेक्षा योगी श्रेष्ठ आहेत. पाण्याने वरवरचा मळ निघतो; पण योग्यांच्या ज्ञानाने अंतर्बाहय निर्मळता होते. पाण्याने एकदा संतुष्टता मिळते आणि परत तहान लागते, पण योगी चिरकाल टिकणारी स्वानंदतृप्ती देतात. उदकाचा म्हणजे पाण्याचा गोडवा फक्त जिभेलाच कळतो पण योग्यांचा गोडवा, त्यांचे ज्ञानाचे शब्द, प्रेम सर्व इंद्रियांना तृप्त करतात. मेघांच्या पाण्याने अन्नधान्य पिकते व जनांची भूक भागते. पण योग्यांच्या कीर्तनाने, निजज्ञानाने जनांचा उद्धार होतो. त्यांचे पूर्ण जीवन सफल होते.