आईच्या प्रेमाला जगात दुसरी उपमा नाही. ‘आई सारखी मायाळू आईच’ असे म्हणतात. मग ती आई कोणीही असो. प्राणी असो की पक्षी असो. तिचे बाळ, लेकरू, पिल्लू जर संकटात असेल तर ती त्याला सोडवण्यासाठी स्वत:चा जीव धोक्यात घालतेच घालते.
प्रस्तुत अभंगातून आईच्या प्रेमाची महती सांगताना संत नामदेव सांगतात की, ‘आगीमध्ये जर एखादं बाळ सापडलं तर त्याची दयाळू आई अती व्याकूळ होऊन त्याला वाचवते.’ प्राण्याच्या प्रेमाबद्दल सांगताना संत नामदेव सांगतात की, एखाद्या गाईचे वासरू भूकेने व्याकूळ होऊन ओरडत असेल तर ती माता (गाय) त्याच्यासाठी धावून जाते. त्याचप्रमाणे जंगलाला वणवा लागला असेल आणि जर एखादया हरिणीचे पाडस त्यात सापडले तर ती हरिणी त्यास वाचवण्यास अती चिंतातूर होते. त्याचप्रमाणे एखादया पक्षिणीचे पिल्लू घरट्यातून खाली जमिनीवर पडले तर ती पक्षिणी त्याला वाचवण्यासाठी लगेच झेप घेते.